कवी बी

कवी बी हे नामाभिधान धारण करून नारायण मुरलीधर गुप्ते (१८७२-१९४७) यांनी आपल्या अमृतमधुर गुंजारवाने मराठीचिये नगरी मधील विचाराचे व कल्पनेचे कुंज काही काळ निनादवून सोडले व तेथील रसिक रहिवाशांवर आपल्या गीतमाधुर्याची जबरदस्त मोहिनी घातली. त्यांच्या कवितांचे संकलन करण्याच्या निमित्ताने त्यांच्या अनेक सुंदर कविता वाचल्या गेल्या आणि त्यांच्या काविश्रेष्ठत्वाची प्रचीती आली.

खरे सांगायचे म्हणजे ‘बी’ हे कवींचे कवि आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे. त्यांच्या कवितांची शैली ही अतिशय बांधेसूद आणि मधुर आहे. दीर्घकविता हे कवी ‘बीं’च्या लेखन शैलीचे वैशिष्ठ्य. त्यांच्या प्रणयपत्रिका, बकुल, माझी कन्या, चाफा, वेडगाणे या काही विशेष उल्लेख कराव्या अश्या कविता! यातील ‘माझी कन्या‘ ही कविता पूर्वी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांना अभ्यासाला असल्यामुळे आणि ‘चाफा‘ ही कविता लता मंगेशकरांच्या समधुर स्वरात गीतबद्ध झाल्यामुळे सर्वोपरीचीत आहे.

त्यांची पहिली कविता ‘प्रणय पत्रिका‘ ही वर्‍हाडात चिखलदरा येथे दिनांक १४ सप्टेंबर १८९१ रोजी लिहिली गेली. त्यावेळी ते सुमारे १९ वर्षांचे असावेत. ही कविता त्याच वर्षी कै. हरिभाऊ आपटे यांच्या ‘करमणूक’ पत्रात प्रसिद्ध झाली. अनेक दिवस झाले तरी प्रियकराचे कुशल सांगणारे पत्र आले नाही म्हणून चिंताग्रस्त अश्या प्रेयसीचे आपल्या प्रियकराला लिहिलेले पत्र म्हणजे ‘प्रणय पत्रिका’.

किति तरि दिन झाले ! भेट नाही पदांची,
करमत मज नाही; वेळ वाटे युगाची.

या ओळींवरून आपल्या पतीचा विरह सहन होत नाहीये त्या प्रेयसीला हे दिसून येते तर,

तरल मन नराचे राहते ऐकते मी
विसर बघुनि पावे अन्य पात्रास नामी.

कमलिनि भ्रमराला नित्य कोशात ठेवी
अविरत म्हणुनी तो पंकज प्रेम दावी.

विसर पडुनि गेला काय माझाही नाथा ?
म्हणुनिच धरिले हे वाटते मौन आता

आपल्याला कुणा दुसऱ्या सुंदरीचा मोह तर झाला नाही आणि म्हणून आपण मला विसरलात तर नाही, अशी भीती ही प्रेयसी काव्यारुपातून व्यक्त करते आहे. जसा भ्रमराला कमळाचा मोह होतो आणि त्याच्या संपर्कात असताना तो सारे भान विसरतो, तसे तर आपले झाले नाही ना, आणि म्हणून आपण मौन धरले का ? असा प्रश्न प्रेयसी या प्रणय पत्रिकेत करते. कमळ आणि भ्रमर या समर्पक उदाहरणातून कवी बी या प्रेयसीच्या मनातली खळबळ अतिशय सुंदर रित्या व्यक्त करून जातात.

१९११ साली ‘बी’ हे अभिनव नाव धारण करून त्यांनी “टला-ट रीला-री । जन म्हणे काव्य करणारी ।” ही ‘वेडगाणे‘ नावाची एक अत्यंत नादमधुर व तात्त्विक कविता ‘मासिक मनोरंजनात’त प्रसिद्ध केली. केवळ यमकाला यमक जुळवून अर्थहीन काव्य करण्यावर उपहासात्मक आणि तात्त्विक अशी ही कविता म्हणजे बींच्या प्रतिभेचे एक उत्तम उदाहरण. परंतू ही अतिशय अर्थपूर्ण कविता रचताना स्वतः कवी बी मात्र यमक जुळविल्याशिवाय रहात नाहीत. पण हे सारे साधताना कवितेचे सौंदर्य देखील त्यांनी ढळू दिले नाही. उदाहरण दाखल याच ओळी पहा ना,

पाचूंच्या वेली
न्हाल्या लावण्याच्या जली
दारी उभ्या स्वर्गीय नरनारी-ग,
जन म्हणे काव्य करणारी.

काव्यलेखनातील विषयांचे वैविद्ध्य दाखवणारी उत्तम कविता म्हणजे ” माझी कन्या”. शाळेतील श्रीमंत घरातील मैत्रिणींचे आपल्या लंकेच्या पार्वतीसमान अवताराला वाईट बोललेले ऐकून घरी रडत आलेल्या आपल्या छोट्या मुलीला समजावून सांगणाऱ्या गरीब पित्यावरची ही कविता. जरी ही कविता त्या लहान मुलीला समजवण्यासाठी लिहिलेली असली तरी ती कितीतरी बोध देऊन जाते. सद्गुणांची श्रीमंती असलेल्याने वस्त्रालन्कारांच्या गरिबीची लाज बाळगू नये हा किती महत्वाचा संदेश ही कविता देते. अश्या उत्तम वैचारिक कविता हे कवी बींच्या लेखनाचे वैशिष्ठ्य.

रत्‍न सोने मातीत जन्म घेते,
राजराजेश्वर निज शिरी धरी ते;

कमळ होते पंकांत, तरी येते
वसंतश्री सत्कार करायाते.

पंकसंपर्के कमळ का भिकारी ?
धूलिसंसर्गे रत्‍न का भिकारी ?

सूत्रसंगे सुमहार का भिकारी ?
कशी तूही मग मजमुळे भिकारी ?

या ओळींमधून अतिशय सुंदर उदाहरणे देऊन ते वडील आपल्या मुलीला हे समजावू पाहतायेत की आपल्या गरिबीची तू लाज बाळगू नकोस मुली, कारण, जरी रत्न, सोने मातीत जन्म घेत असले तरी ते राजे परिधान करतात, जरी कमळ चिखलात उगवत असले तरी ते देऊनच सत्कार केला जातो; मग धुळीच्या संपर्काने रत्नाचे महत्व कमी का होते? आणि चिखलात जन्मले म्हणून कमळ सुंदर नसते का? दोऱ्यात ओवला म्हणून फुलांचा हार भिकारी नसतो, तर मग माझी लेक म्हणून तू कशी भिकारी ठरशील? पुढे जाऊन आपल्या कवितेत कवी बी म्हणतात,

भेट गंगायमुनास होय जेथे,
सरस्वतिही असणार सहज तेथे;

रूपसद्‍गुणसंगमी तुझ्या तैसे,
भाग्य निश्चित असणार ते अपेसे.

जसा गंगा यमुने समवेत सरस्वतीचा देखील संगम आहे, त्याप्रमाणेच तुझ्या ठायी असलेल्या रूप सद्गुणासमवेत तुझे भाग्य सुद्धा निश्चितच उजळ असेल , तेव्हा तू वसने आणि आभूषणे नाहीत म्हणून शोक करू नकोस. इतक्या सहृदयतेने आपल्या लाडक्या लेकीला समजावणाऱ्या पित्याची आदर्श प्रतिमा या कवितेतून कवी बी उभी करतात.

१९११ ते १९३३ पर्यंत, म्हणजे सुमारे एक तपभरच ‘बी’ कवींची प्रतिभा फुलून आली असे म्हणता येईल. १९३४ साली त्यांचा “फुलांची ओंजळ” हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. विद्यमान कविवृंदात वयाने व गुणांनी जे वंद्य व आदरणीय कवि समजले जातात त्यांच्यामध्ये कविवर्य ‘बी’ यांचे स्थान निःसंशय थोर आहे. म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख व कृतीचा उल्लेख होताच आधुनिक तरुण कवींच्या माना मुजर्‍यासाठी खाली लवतात. आणि याचा प्रत्यय आपणास यावा व त्यांच्या उत्तमोत्तम कविता वाचता याव्या म्हणून ब्लॉग च्या रुपात त्याचे संकलन !!

– प्रियांका आणि स्वानंद

6 thoughts on “कवी बी

  1. आपण हे वेब पेज सादर करून कवितेवर आणि तेही विशेषतः कविवर्य बी ह्यांच्या कवितेविषयी आदर असणाऱ्यांवर उपकार केले आहेत ! निश्चितच खूप मोठा खजिना उपलब्ध करून दिला आहे मनपूर्वक आभारी आहे ! मराठीचे वैभव कळण्यासाठी अशा साहित्याचे उपलब्ध होणे हा मराठी भाषेसाठी एक चांगला संकेत आहे !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s